बेळगाव : शहरातील मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी बेळगाव शहरात १५० BSNL 4G टॉवर्स मंजूर करावेत, अशी मागणी बेळगाव ऑटोव्हॅन मर्चंट असोसिएशनच्या वतीने खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे करण्यात आली.
दूरसंचार विभागाने कर्नाटक राज्यासाठी एकूण १,००० BSNL 4G टॉवर्स मंजूर केले आहेत. या मंजूर टॉवर्सपैकी १५० टॉवर्स बेळगाव शहरासाठी उपलब्ध करून दिल्यास शहरातील विविध भागांमध्ये भेडसावणारी मोबाईल नेटवर्कची समस्या कमी होण्यास मदत होईल, असे असोसिएशनने निवेदनात नमूद केले.
शहराचा वाढता विस्तार, नागरिकांची वाढती मोबाईल व इंटरनेटवरील अवलंबित्व आणि विविध भागांतील नेटवर्कची समस्या लक्षात घेता BSNL 4G पायाभूत सुविधा वाढविण्याची गरज असल्याचे असोसिएशनने सांगितले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील आणि सचिव कमरपिंड सौदागर उपस्थित होते.
निवेदनातील मागणीची दखल घेत खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव शहरासाठी जास्तीत जास्त BSNL 4G टॉवर्स मिळवून देण्यासाठी संबंधित पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
शहरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी या मागणीला मंजुरी मिळाल्यास नागरिकांसह व्यावसायिक, व्यापारी आणि विविध सेवा क्षेत्रांना त्याचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
