बेळगाव : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव पोलिसांनी आंदोलनासंदर्भात महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. शहरात कोणतेही आंदोलन आयोजित करण्यापूर्वी संबंधित आयोजकांनी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असल्याचे पोलीस आयुक्त भूषण राव बोरसे यांनी स्पष्ट केले आहे.
पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, परवानगीशिवाय आंदोलन केल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. शहरात वारंवार होणाऱ्या आंदोलनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून, सामान्य नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय, आंदोलन आयोजित करण्यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती, आवाहन किंवा पोस्ट प्रसिद्ध करण्यापूर्वीही आवश्यक पोलिस परवानगी घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पोलीस प्रशासनाने सर्व संघटना, संस्था आणि नागरिकांना कायद्याचे पालन करूनच आंदोलनाचे नियोजन करण्याचे आवाहन केले असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही सांगितले आहे.









