पुणे: येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून सुरू झाला आहे. खेळाच्या पहिल्या दिवशी भारतातर्फे वाशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडच्या फलंदाजांची नांगी मोडली. वॉशिंग्टन सुंदरने आजच्या दिवशी एकूण सात फलंदाजांना पॅवेलियनचा रस्ता दाखवला. त्याने 45 महिन्यानंतर कसोटी पुनरागमन करताना 59 धावा देऊन तब्बल सात विकेट घेऊन आजचा दिवस आपल्या नावे केला. 79.1 ओव्हरमध्ये न्यूझीलंडने पहिल्या डावामध्ये सर्वबाद 259 धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे डेविन कॉनवे याने 76 धावांचे, रचीन रवींद्र याने 65 धावांचे, म्युचल सेंटर ने 33 धावांचे योगदान दिले.
आर अश्विनने 64 धावा देऊन तीन विकेट मिळवल्या. तत्पूर्वी न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या सत्रांमध्ये दोन बाद 92 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली होती. त्यानंतर ही त्यांची खेळी चांगली झाली. मात्र खेळाच्या तिसऱ्या सत्रांमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी. वॉशिंग्टन सुंदरपुढे सपशेल शरणागती पत्करली. एकवेळ न्यूझीलंडची तीन बाद 138 अशी मजबूत स्थिती असताना सर्व बाद 259 अशी स्थिती झाली. याचे संपूर्ण श्रेय वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विनी याना जाते.
भारतीय डावाची खराब सुरुवात
न्यूझीलंडचा संपूर्ण संघ बाद झाल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला मैदानात उतरला. पण भारतीय डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा 9 चेंडूचा सामना करून शून्य धावांवर तंबूत परतला. त्यानंतर शिल्लक ओव्हर्स यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी संयमीपणाने खेळून काढली. खेळ थांबला तेव्हा शुभमन दहा धावांवर आणि यशस्वी जयस्वाल सहा धावांवर नाबाद खेळत होते. विशेष म्हणजे न्यूझीलंडने भारताला पहिल्या डावात एकही अवांतर धाव दिली नाही. टीम साऊदीने रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले.
भारतीय संघात तीन बदल
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघामध्ये तीन बदल करण्यात आले होते. मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि के एल राहुल यांच्याजागी वाशिंग्टन सुंदर , शुभमन गिल आणि आकाशदीप यांचा समावेश करण्यात आला होता. हा संघ निवडीचा निर्णय भारताला खरोखरच फायदेशीर ठरला. वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंड टीमची वाट लावली. त्याने सात विकेट घेऊन आजचा दिवस आपल्या नावे केला.