शहर परिसरात लक्ष्मीपूजन धुमधडाक्यात
बेळगाव:दीपावलीनिमित्त शहर आणि परिसरामध्ये शुक्रवारी मोठ्या उत्साहामध्ये आणि धुमधडाक्यामध्ये लक्ष्मी कुबेर पूजन संपन्न झाले.शहरातील आणि ग्रामीण भागातील दुकानदारांनी लक्ष्मीपूजनानिमित्त दुकाने आकर्षकपणे सजवली होती.दुकानांना फुलांच्या माळाबरोबरच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
सर्वत्रच लक्ष्मी कुबेर पूजनाची धामधूम सुरूच होती. उशिरापर्यंत लक्ष्मीपूजन सुरू होते. लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्याचबरोबर प्रसादाचेही वितरण करण्यात आले. लक्ष्मीपूजनानिमित्त नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
खासकरून सोन्या आणि चांदीच्या दुकानांमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या
दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. फळे ,फुले, मिठाई , पेढे तसेच इतरही गोडधोड पदार्थांच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी दिसून आली.
शहरातील गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक,
मार्केट ,मारुती गल्ली ,कडोलकर गल्ली , खडेबाजार , किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली इत्यादी ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून आली. शनिवारी दीपावली पाडवा असल्याने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होणार आहे. विशेषकरून वाहने आणि सोने चांदीच्या खरेदीमध्ये मोठी उलाढाल अपेक्षित आहे. एकूणच शहर आणि परिसरामध्ये शुक्रवारी लक्ष्मी कुबेर पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.