भारत अजूनही 125 धावांनी पिछाडीवर
बेंगलोर (श्रीधर पाटील):भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये बेंगलोर येथे सुरू असलेली पहिली कसोटी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. कसोटीच्या पहिल्या डावांमध्ये भारताने सर्व बाद 46 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावामध्ये भारताने तिसऱ्या दिवस अखेर तीन बाद 231 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्व बाद 402 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ अजूनही 125 धावांनी पिछाडीवर आहे. कसोटीचे अजूनही दोन दिवस शिल्लक आहेत. अशा अवस्थेत कसोटी सामना अत्यंत रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचला आहे. चौथ्या दिवशी भारतीय संघाने विकेट टिकवून जास्तीत जास्त धावा करणे गरजेचे आहे. भारतीय संघाने अजूनसुद्धा किमान 400 हून अधिक धावा करणे गरजेचे आहे. त्यासाठी खेळपट्टीवर नाबाद असलेल्या सर्फराज खान त्याचबरोबर वृषभ पंत, के एल राहुल, रवींद्र जडेजा, आर आश्विन व इतर फलंदाजांनी चांगली फलंदाजी करणे गरजेचे आहे. तेव्हाच न्यूझीलंडसमोर एक चांगले टारगेट राहील राहील.
शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा भारताने 49 षटकात तीन बाद 231 धावा जमवल्या होत्या. सेट झालेला बॅट्समन सर्फराज खानराज खान 70 धावांवर नाबाद खेळत आहे. भारताच्या दुसऱ्या डावामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी केली. गरज नसलेला फटका मारण्याच्या नादामध्ये यशस्वी जयस्वाल 35 धावांवर बाद झाला. त्यानंतर काही वेळाने कर्णधार रोहित शर्मा देखील 52 धावांवर विचित्ररित्या बाद झाला.
त्यानंतर विराट कोहली आणि सर्फराज खान या दोघांनी संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला. या दोघांनी 136 धावांची भागीदारी करून भारताच्या डावाला आकार दिला. विराट कोहली चांगली फटकेबाजी करत होता पण तो 70 धावांवर बाद झाला आणि पॅवेलियनमध्ये परतला. दुसऱ्या बाजूने सर्फराज खान याने चौकार, षटकारांची आतषबाजी करत उपस्थित असलेल्या क्रिकेट शौकिनांचे मनोरंजन केले. तिसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा सर्फराज खान 70 धावांवर नाबाद खेळत होता.
खेळाच्या चौथ्या दिवशी नाबाद असलेल्या सर्फराज खान याला उर्वरित फलंदाजांनी चांगली साथ देणे गरजेचे आहे. न्यूझीलंडसमोर मोठे टार्गेट ठेवणे गरजेचे आहे. शनिवारी दिवसभर चांगली फलंदाजी करून भारताने शेवटच्या सत्रांमध्ये न्यूझीलंडला फलंदाजीस आमंत्रित करणे गरजेचे आहे. न्यूझीलंडला किमान चारशे धावांच्यावर टार्गेट देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करून विकेट लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे. अन्यथा कसोटी ड्रॉ करण्यासाठी फलंदाजांनी खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शतक करण्याची संधी
सर्फराज खान याला कसोटीमध्ये पहिले शतक करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यासाठी त्याने संयमाने खेळी करणे गरजेचे आहे. शुक्रवारी देखील जलद धावा बनवल्या आहेत. क्रिकेट शौकीन त्याचे शतक पाहण्यासाठी शनिवारी मैदानावर उपस्थित राहणार आहेत.
पहिली कसोटी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली असून दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे. पण त्यातल्यात्यात न्यूझीलंडला संधी जास्त आहे असे दिसते. खेळाच्या शिल्लक दोन दिवसांमध्ये क्षेत्ररक्षण ,फलंदाजी ,गोलंदाजी यामध्ये ज्यांचे वर्चस्व राहील तोच संघ बादशाह होणार हे स्पष्ट आहे.
फाजील आत्मविश्वास नडला
बांगलादेशचा व्हाइटवॉश केल्यानंतर न्युझीलँडला देखील आपण सहज हरवू असा फाजिल आत्मविश्वास टीम इंडियाला नडल्याचे दिसत आहे. त्यामुळेच भारताच्या फलंदाजांनी पहिल्या डावामध्ये सपशेल नांगी टाकली. कसोटीमध्ये मायदेशात खेळताना भारताने सर्वात कमी धावसंख्या नोंदवली. पूर्वी वेस्टइंडीज विरुद्ध भारताने कसोटीमध्ये मायदेशात 75 धावा नोंदवल्या होत्या. पहिल्या डावात भारतातर्फे फक्त दोनच फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली होती.