कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या केरुर येथील श्री मलकारी सिद्धेश्वर व श्री अरण्यसिद्धेश्वर देवाची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली. यात्रेच्या शेवटच्या दिवशी भंडाऱ्याच्या उधळणीत भाविक भंडाऱ्यात रंगून गेले होते.
असंख्य भक्त करत असलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीमुळे जिकडे पाहावे तिकडे पिवळा धमक असा जनसागर दिसत होता. भंडाराच्या मुक्त उधळणीत एक प्रकारचा जल्लोष व घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता यात्रेच्या शेवटच्या दिवशी निवाळकी व भाकणूक व दुपारी देवास अभिषेक करण्यात आला यावेळी भाविक उपस्थित होते.
सकाळी ठीक आठ वाजता श्री मालकारी सिद्धेश्वर व अरण्यसिद्धेश्वर देवाची पालखी उठविण्यात आली. यावेळी पालखीवर भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. देवाच्या मानकऱ्यांसह व यात्रा कमिटीच्या सदस्यांसह सवाद्य मिरवणुकीने जाऊन देवास मानाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर भाविकांनी नैवेद्य अर्पण केला .मंदिर परिसरात दाखल झालेल्या भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.पाच दिवस चाललेल्या या यात्रेत विविध शर्यती व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.