बेळगाव : हाँगकाँग, चीन येथे होणाऱ्या खुल्या आंतरराष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी रवाना होणाऱ्या बेळगावच्या ज्युडो खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज खास शुभेच्छा दिल्या.
हाँगकाँग, चीन येथे येत्या ८ ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत खुल्या आंतरराष्ट्रीय ज्युडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या बेळगाव डीवायईएस केंद्राच्या ज्युडो खेळाडू साईश्वरी कोडचवाडकर, भूमिका व्ही. एन. आणि भारतीय संघाच्या प्रशिक्षिका एनआयएस ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील यांनी आज बुधवारी सकाळी डीवायईएस उपसंचालक श्रीनिवास बी. यांच्या समवेत जिल्हाधिकाऱ्यांची (डीसी) त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांची संवाद साधून त्यांना चीनमधील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन सुयश चिंतले.