चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ
बेळगाव:
नरगुंदकर भावे चौक येथे गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे मान्यवरांचे हस्ते विधिवत पूजन करून भव्य चित्ररथ मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने विविध गल्लीच्या सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एका पेक्षा एक सुंदर देखावे सादर केले होते. हे देखावे पाहून शिवकालीन अनेक प्रसंगाची आठवण झाली. जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र नजरेसमोर आले.
महाराजांच्या जीवनामधील अनेक ऐतिहासिक प्रसंग या मिरवणुकीमध्ये सादर करण्यात आले होते. लहान मुलांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांची हुबेहूब प्रतिकृती साकारली होती.
पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत पालखी पुढे पुढे मार्गक्रमण करत होती. पालखी आकर्षकपणे सजवण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अखंड जयघोष आणि भगव्या ध्वजांसह सुरू झालेल्या मिरवणुकीमुळे अवघे वातावरण शिवमय झाले होते.
‘आम्ही गड्या डोंगरचे राहणार शिवबाचे चाकर होणार’ अशा गीतानी शिवप्रेमींची मने जिंकली. मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये शिवभक्त सहभागी झाले होते. गुरुवारी सायंकाळी सुरू झालेली चित्ररथ मिरवणुक दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत सुरूच होती. बेळगावची चित्ररथ मिरवणूक ऐतिहासिक म्हणून ओळखली जाते. यामुळे बेळगाव शहराबरोबरच बेळगाव परिसरातील विविध ठिकाणाहून शिवप्रेमी मोठ्या संख्येने या चित्ररथ मिरवणुकीला उपस्थित होते.