येळ्ळूर यात्रा उत्सवाला प्रारंभ
मंगळवारी इंगळ्या ,
गुरुवारी कुस्ती मैदान
बेळगाव:
येळ्ळूरचे ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवी, श्री कलमेश्वर देवस्थान आणि श्री महालक्ष्मी देवी अशा संयुक्त यात्रोत्सवाला सोमवार दिनांक 21 एप्रिल पासून अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. यात्रेनिमित्त चार दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी श्री कलमेश्वर आणि श्री चांगळेश्वरी मंदिर समोर इंगळ्याचा कार्यक्रम होणार आहे. तसेच गुरुवारी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन महाराष्ट्र मैदान येथे करण्यात आले आहे.
सोमवारी सायंकाळी आंबील गाड्यांची वाजत गाजत मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा आंबील गाडे मिरवणूक होणार आहे. एकापेक्षा एक सुंदर गाडे पाहायला मिळतात. मंगळवारी सायंकाळी श्री कलमेश्वर आणि त्यानंतर श्री चांगळेश्वरी मंदिरासमोर इंगळयाचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न होतो.https://dmedia24.com/birds/
बुधवारी सकाळी श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस संपन्न होतो. त्यानंतर महाराष्ट्र मैदानामध्ये सायंकाळी खळ्यांच्या कुस्त्या होतात. गुरुवारी दुपारनंतर महाराष्ट्र मैदान येथेच भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान होणार आहे. या मैदानामध्ये यावर्षी शेरा पंजाब विरुद्ध मिर्झा इराण यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. कुस्ती शौकिनांना एक चांगली कुस्ती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कुस्ती शौकिनांचे या मैदानाकडे लक्ष लागून राहिले आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व मंदिरांची रंगरंगोटी करून, स्वच्छता करून मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहेत. यात्रा कमिटी सर्व प्रकारच्या व्यवस्थेवर लक्ष देऊन आहे. यात्रेनिमित्त जादा बसेसचे नियोजन ही करण्यात आले आहे.