बेळगाव: ‘पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा ‘ , ‘येता अधिवेशन बेळगावात तोची वेग येई रंगरंगोटीला ‘ येत्या 9 डिसेंबर पासून कर्नाटक राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील विधानसौधमध्ये सुरू होणार आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कंपाउंडच्या भिंती विविध रंगाने सजू लागल्या आहेत.
सोमवारी शहरातील सदाशिवनगर येथील कंपाउंड भिंतींवर आकर्षक चित्रे काढताना दिसून आले. याचाच अर्थ असा आहे की अधिवेशन जवळ येताच, जिल्हा प्रशासनाला शहर स्वच्छतेची आणि रंगरंगोटीची खडबडून जाग येते.
शहराच्या सुशोभीकरणाच्या कामाला वेग आल्याचे दिसत आहे. ज्याप्रमाणे नियोजित विवाहितेच्या लग्नसमारंभामध्ये कोणतीही कमतरता राहू नये याची जशी दक्षता घेतली जाते अगदी त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन हिवाळी अधिवेशनाच़ी दखल घेत असल्याचे दिसत आहे.
मंत्री, आमदार आणि महनीय व्यक्ती शहरांमध्ये येण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते गुळगुळीत केले जातात, कंपाउंडच्या भिंती आकर्षक रंगविल्या जातात, पथदिपांची दुरुस्ती केली जाते तसेच अन्य सुविधांची देखील उपलब्धता करून दिली जाते. इतर वेळेला अशा सुविधा का उपलब्ध होत नाहीत ?असा सवाल नागरिक विचारत आहेत.