पुणे: येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रामध्ये भारतीय शेर न्यूझीलंडच्या गोलंदाजीपुढे ढेर झाले. एकाही फलंदाजाला गोलंदाजांसमोर टिकून राहता आले नाही.
त्यातल्या त्यात यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी प्रत्येकी 30 धावा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खेळाच्या दुसऱ्या दिवशी भारताने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 38 ओव्हर मध्ये सात बाद 107 अशी धावसंख्या उभारली. अजूनही भारत 152 धावांनी पिछाडीवर असून फक्त तीन विकेट शिल्लक आहेत. रवींद्र जडेजा नाबाद 11 आणि वॉशिंग्टन सुंदर 2 धावांवर नाबाद खेळत आहेत. आता फक्त यापैकी रवींद्र जडेजा हाच मुख्य फलंदाज आहे.
गुरुवारी टॉस जिंकून न्यूझीलंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी सर्व बाद 259 धावा केल्या. तर उरलेल्या ओव्हरमध्ये भारताने एक बाद 16 धावा केल्या. गुरुवारी नाबाद राहिलेल्या यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी खेळायला सुरुवात केली. त्यांनी दुसऱ्या गड्यांसाठी 49 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर मात्र कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहू शकला नाही. एकापाठोपाठ एक एक फलंदाज बाद होऊन तंबूत परत गेला. त्यामुळे भारताने पहिल्या सत्रामध्ये 38 ओव्हर मध्ये सात बाद 107 धावा केल्या आहेत.