येळ्ळूरची यात्रा 21 एप्रिलपासून
बेळगाव , प्रतिनिधी:
येळळूरची ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवी यात्रा उत्सव 21 एप्रिल पासून सुरू होणार आहे. 21 ते 24 एप्रिल पर्यंत यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे.
सोमवार दि. 21 रोजी सायंकाळी आंबील गाडे, मंगळवारी सायंकाळी इंगळया कार्यक्रम, बुधवारी सकाळी श्री लक्ष्मी देवीचा वाढदिवस आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम तर गुरुवारी भव्य महाराष्ट्र कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुस्ती कमिटी आणि यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील मैदान
यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणारे येळ्ळूरचे महाराष्ट्र कुस्ती मैदान हे राष्ट्रीय स्तरावरील नामवंत मल्लांचे मैदान म्हणून ओळखण्यात येते. नामवंत मल्लांची दर्जेदार कुस्ती या मैदानामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे या कुस्ती मैदानाला लाखोच्या संख्येने कुस्ती शौकीन उपस्थिती दर्शवतात. कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी कुस्ती कमिटीचे सदस्य दिवस-रात्र कष्ट घेत असतात.
यात्रा उत्सवानिमित्त परिवहन महामंडळाकडून देखील यात्रा स्पेशल बसेसची व्यवस्था करण्यात येते. यात्रा चार दिवस सुरू राहते त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. यात्रेच्या पार्श्वभूमीवर या दरम्यान मोठी आर्थिक उलाढाल होते.