येळूळर सैनिक सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात
बेळगाव:
सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या आणि ‘ विना सहकार नही उद्धार’ या तत्त्वानुसार कार्यरत असलेल्या येळ्ळूर येथील सैनिक मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा 28 वा वर्धापन दिन नुकताच संस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सैनिक भवनचे अध्यक्ष मोनाप्पा पाटील हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात सोसायटीचे चेअरमन परशराम घाडी यांच्या हस्ते लक्ष्मीपूजनाने करण्यात आली. मोनाप्पा पाटील यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित संचालक मंडळ आणि सभासदांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना चेअरमन परशराम घाडी म्हणाले, आमच्या संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. ग्राहक , सभासद , ठेवीदार या सर्वांच्या हितासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध आहे. तसेच त्यांनी संस्थेच्या नवीन योजनांची माहिती दिली. संस्था स्थापनेपासून ते आज पर्यंतच्या संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा त्यांनी घेतला. सभासदांच्या विश्वासामुळे तसेच संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे संस्था गरुड झेप घेत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मोनाप्पा पाटील म्हणाले, सर्वांनी एकजुटीने काम केल्याने संस्थेचा नवलौकिक वाढला आहे. संस्थेची दिवसेंदिवस भरभराट होत आहे. संस्थेच्या विकासामध्ये सर्वांचेच योगदान आहे.
कार्यक्रमाला व्हाईस चेअरमन गोपाळ हुंदरे, ज्येष्ठ संचालक बाबुराव मुरकुटे, कल्लाप्पा पाटील, नागेंद्र पोटे, उमेश गोरल, राजू हुंदरे, राजेंद्र हंपन्नावर, संचालिका नर्मदा पाटील, शांता कदम, अनुसया पुण्याणावर, सल्लागार अप्पाजी कुगजी, तुकाराम कणबरकर, सेक्रेटरी यल्लाप्पा बिर्जे आणि कर्मचारी उपस्थित होते.