यश ऑटो तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
– डॉ. आनंद पाटील यांचे ‘सम्राट शहाजी-शिवाजी’ या विषयावर प्रभावी विचारमंथन
बेळगाव (प्रतिनिधी) :
गणेशपूर (राकसकोप रोड), बेळगाव येथील यश ऑटोमोबाईल्स या ठिकाणी दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी शिवजन्मोत्सव सोहळा भक्तिभाव, इतिहासप्रेम व उत्साहाने साजरा करण्यात आला. गेली 28 वर्षे सातत्याने व्यवसायस्थळी शिवजयंती साजरी करणाऱ्या शिवसंत संजय आर. मोरे यांच्या पुढाकाराने हा सोहळा यंदाही विशेष ठरला.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले प्रा. डॉ. आनंद पाटील-संकपाळ यांचे “शोध दोन सम्राटांचा : शहाजी-शिवाजी” या विषयावर झालेले अभ्यासपूर्ण, इतिहासदृष्टी समृध्द विचारमंथन. यावेळी त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या “मराठा साम्राज्य सूर्य वजीर शहाजी भोसले” या ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसंत संजय मोरे होते. राष्ट्रपती सन्मानित चित्रकार व कोल्हापूरच्या नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अल्पना सोपान चौगुले यांनी विशेष उपस्थिती दर्शवून सोहळ्याला गौरव प्राप्त केला.
यावेळी राणोजी मोरे , रत्नोजी मोरे व कौशल्या मोरे या बाल शिवप्रेमींनी शिव गर्जना केले .तसेच कु .वैभवी विकास मोरे संभाजी महाराज यांच्यावर भाषण केले .
तानाजी पाटील , देवयानी पाटील व हेमा घाडगे यांनी पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली . यावेळी स्वागतगीत वर्षा खामकर यांनी सादर केले.
सुषमा संजय मोरे ,
आहिल्या मोरे व अरुणा मोरे यांनी मान्यवरांचे औक्षण केले .
रणजित चौगुले यांनी प्रास्ताविक सादर केले. रवींद्र पाटील यांनी यश ऑटो व ‘शिवसंदेश भारत समूह’ यांच्या सामाजिक कार्याचा आढावा उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडला.
या वेळी सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या हस्ते बेळगाव लाईव्हचे संपारक पत्रकार प्रकाश बिळगोजी व व्हाईस ऑफ वेणुग्रामचे संपादक मंजूनाथ दोडमनी यांचा शाल, राजमुद्रा अंगठी, सन्मानचिन्ह व जिजाऊप्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.
याशिवाय कोल्हापूरच्या रायगडचे वारकरी के. एन. पाटील गुरुजी, मिलिंद पाटील व डॉ. सोपान चौगुले यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास ॲड. सुधीर चव्हाण, महादेव चौगुले, ईश्वर लगाडे, अजित यादव, एम. के. पाटील, रामलिंग मोरे, के. आर. मोटर, अजित मोरे, नागेश ढेगसकर, प्रा. रमेश भोसले, संदिप तरळे , संजय गुरव , दत्ता कानूरकर , पत्रकार शंकर कंग्राळकर , शरद मोरे , विकास मोरे व राहुल मोरे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. सर्वांचाच सन्मान सोहळ्यात करण्यात आला.
उपस्थित सर्व शिवप्रेमींना डॉ. अल्पना चौगुले यांच्या ‘राज्याभिषेक’ चित्राची प्रत भेटस्वरूप देण्यात आली.
कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन एल. पी. पाटील यांनी करत वातावरण भारावून टाकले. या सोहळ्यातून यश ऑटो हे केवळ व्यवसायाचे केंद्र नसून, संस्कार, इतिहासप्रेम आणि समाजप्रबोधनाचे व्यासपीठ म्हणून कार्यरत असल्याचे अधोरेखित झाले.
कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली.