येळ्ळूर येथे हजारो लिटर पाणी वाया
बेळगाव, प्रतिनिधी:
येळ्ळूर येथील धर्मराज गल्लीतील सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. त्यामुळे नागरिकांमधून ग्रामपंचायत विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, धर्मराज गल्ली येथील गटारीचे नवीन बांधकाम करण्यासाठी काही दिवसांपूर्वी जुने बांधकाम फोडण्यात आले होते. जेसीबीच्या साह्याने हे बांधकाम फोडताना जवळून गेलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक पाईपलाईनला जेसीबीचा धक्का लागला होता. त्यामुळे पाईपलाईन फुटली होती. याची माहिती पाणी सोडणाऱ्या ग्रामपंचायतीच्या वॉटरमन ला नव्हती.
थोड्या वेळाने तेथील जागरूक युवक आणि नागरिकांनी पाणी वाया जात असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी हे वाया जाणारे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना हे पाणी थांबवणे शक्य झाले नाही. परिणामस्वरूप हजारो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे या परिसरातील घरगुती नळांना पाणी येऊ शकले नाही. ग्रामपंचायतच्या या कारभाराबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायतने सदर पाईपलाईनची त्वरित दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा , अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.