एसबीआयचे विलास काळे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मधील आपल्या 40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले सीनियर असिस्टंट रेकॉर्ड विलास धोंडीबा काळे यांना काल शुक्रवारी बँकेतर्फे सत्कार करून निरोप देण्यात आला.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शहरातील पाटील गल्ली येथील शाखा कार्यालयामध्ये या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करून एसबीआय कर्मचारी दीप्ती सिंग यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. त्यानंतर शाखा व्यवस्थापक एस. श्रीनिवास यांच्या हस्ते सेवानिवृत्त विलास काळे यांचा म्हैसुरी पगडी व पुष्पहार घालून तसेच शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी काळे यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सुरेखा काळे यादेखील उपस्थित होत्या.
यावेळी बँक युनियनचे सेक्रेटरी एकनाथ गिंडे, सागर कित्तूर, हेस्कॉमचे प्रथम दर्जा अधिकारी बेळीकट्टी आदींची सत्कारमूर्ती विलास काळे यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली. विलास काळे यांनी यावेळी बोलताना सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आजवरच्या बँक सेवेदरम्यान केलेल्या सहकार्याबद्दल एसबीआय मधील आपल्या सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. याप्रसंगी प्रशांत हुंदरे, शशिकांत एस., विनायक काळे, विशाल काळे, सुरज काळे, ज्योती कित्तूर यांच्यासह विलास काळे यांचे कुटुंबीय, एसबीआय पाटील गल्ली शाखेतील कर्मचारी आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.