पत्रकारितेच्या क्षेत्रातील तब्बल 30 वर्षाहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुण भारतच्या मनीषा सुभेदार, युएनआयचे एच. व्ही. नागराज आणि उदयवाणीचे केशव आदी या ज्येष्ठ पत्रकारांचा बेळगाव पत्रकार समूहातर्फे आज बुधवारी सत्कार करण्यात आला.
शहरातील माहिती व प्रसिद्धी खात्याच्या कार्यालयामध्ये आज सकाळी या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबुर, बेळगाव श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, पत्रकार सुभाष कुलकर्णी, अशोक चंदरगी आदी उपस्थित होते. प्रारंभी पत्रकार रवी उप्पार यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सत्कारमूर्ती मनीषा सुभेदार, एच. व्ही. नागराज व केशव आदी या ज्येष्ठ पत्रकारांचा शाल, पुष्पहार व पगडी घालून तसेच पुस्तक व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ‘हिंदू’चे बेळगाव प्रतिनिधी ऋषिकेश देसाई यांनी सत्कारमूर्ती पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला. तसेच पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्यामुळे पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. दीर्घकाळ उत्तम पत्रकारिता केलेल्या पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी पत्रकारच एकत्र आले ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे, असे विचार व्यक्त करून सत्कारमूर्तींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकार दिलीप कुरुंदवाडे, मनोहर कालकुंद्रीकर, मेहबूब मकानदार, मुर्गेश शिवपुजी, महेश विजापुरे, मुन्ना बागवान, कीर्ती कासरगोड आदींनी देखील समयोचित विचार व्यक्त करताना सत्कारमूर्तींच्या पत्रकारितेबद्दल गौरवोद्गार काढले. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सत्कारमूर्तींनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. अखेर गुरुनाथ कडबुर यांच्या अध्यक्षीय भाषणाने समारंभाची सांगता झाली. सूत्रसंचालन सुनीता देसाई यांनी केले.