काँग्रेस अधिवेशन शताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम
बेळगाव:
1924 या वर्षी बेळगाव मध्ये महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. त्याला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाच्या वतीने 100 गांधी भारत अधिवेशन बेळगाव मध्ये भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 26 आणि 27 डिसेंबर असे दोन दिवस बेळगाव शहरामध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
26 रोजी बेळगाव येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये 2025 साठी पक्षाच्या कृती आराखड्याची निर्मिती करण्यात येणार आहे. भारतातील सुमारे २०० हुन अधिक नेत्यांचा सहभाग असलेल्या सदर बैठकीला नवसत्याग्रह बैठक असे नाव देण्यात आले आहे. या दिवशी रामतीर्थ नगर येथील गंगाधरराव देशपांडे स्मारकाचा अनावरण कार्यक्रम होणार आहे. तसेच वीरसौध जवळ दुपारी तीन वाजता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे.
27 रोजी सकाळी साडेदहा वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते सुवर्णसौध येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर जय बापू , जय भीम, जय संविधान कार्यक्रम होणार आहे. शहरातील सीपीएड मैदानावर दुपारी एक वाजता जाहीर सभा होणार आहे.
या अधिवेशनाला राष्ट्रीय पातळीवरील नेते मंडळी, मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, अति महनीय व्यक्ती, स्वातंत्र्यसेनानी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे अख्खे शहर प्रकाशाने उजळून गेले आहे. त्याचबरोबर शहरातील विविध ठिकाणी नेते मंडळींच्या स्वागताचे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये ३००० चा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.