*पंतबाळेकुंद्रीत आजपासून श्रीपंत विवाह सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*बेळगाव : विशेष प्रतिनिधी*
*अवधूत सांप्रदायाचे प्रणेते सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्रीत श्रीपंत महाराज व सौ. यमुनाक्का यांच्या विवाह सोहळ्याचे औचित्य साधून ४ ते ६ मे २०२३ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.*
*गुरूवार ४ ते ६ मे या कालावधीत दररोज सकाळी ५.३० ते ७.३० यावेळेत प्रातस्मरण सद्गुरूचे हा श्रीदत्त प्रेमलहरीतील पदे व पारंपरिक पंचपदीचा कार्यक्रम ऑफलाईन पध्दतीने होणार असून, ४ मे रोजी नृसिंह जयंती असल्याने त्या प्रातस्मरण सद्गुरूचे या कार्यक्रमात नृसिंह हा उल्लेख असलेली पदे म्हटली जातील. ५ मे रोजी ९४ वे व ६ मे रोजी ९५ वे सत्र संपन्न होणार आहे.*
*या दोन दिवसीय बोधसत्रात प्रेमतरंग या नवीन ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार असून या शिबिरात प्रेमतरंगावरच अभ्यास व चर्चासत्र आयोजित केले आहे. या दोन दिवसात परमपूज्य अभिजित पंतबाळेकुंद्री, डाॅ. शलाका म्हामुणकर, दत्ता शेलार, दिनेश सुर्वे, बबन कदम, वंदन जोशी, पुंडलिक रक्ताडे, ज्ञानदेव पुंगावकर, मनिष महाजन, डाॅ. संजय भगत, सुहास सातोस्कर यांचे प्रेमतरंगावर अभ्यासपूर्ण विवेचन ऐकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.*
*या सोबतच नित्य कल्याण मंडप येथे ४ ते ६ मे या कालावधीत सामुदायिक पोथीवाचन संपन्न होणार आहे. या श्रीपंत बोधपीठाच्या कार्यक्रमांसोबतच बालगोपाळांचा मेळावा देखील गोपाळ सभागृह येथे संपन्न होणार आहे.*
*४ मे रोजी रात्री उदय कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा श्रीदत्त प्रेमलहरीतील पदांवर आधारित भजनसेवेचा कार्यक्रम होणार आहे. तर ५ मे रोजी रात्री समस्त गुरूभगिनींच्या वतीने पालखीसेवा संपन्न होणार आहे.*
*६ मे रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत श्रीपंत महाराज व सौ. यमुनाक्का यांचा पारंपरिक पध्दतीने विवाह सोहळा संपन्न होणार असून या विवाह सोहोळ्यास सर्व पंतभक्त मंडळींनी उपस्थित राहून श्रीपंत प्रेमाचा आनंद लुटावा असे श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्रीचे अध्यक्ष परमपूज्य राजन पंतबाळेकुंद्री यांनी सांगितले आहे.*