जैन धर्मातील अतिशय तीर्थ असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोथळी कुप्पानवाडी ट्रस्टच्या उषाराणी हत्तीचे निधन झाले.हा मानाचा हत्ती (५२) वर्षाचा होता.
उषाराणीच्या निधनाची बातमी कळताच बेडकिहाळ, शमनेवाडी, चाँदशिरदवाड, बोरगाव, कोथळी, कुप्पानवाडी परिसरातील नागरिक तसेच महिला उषाराणीचे अंत्य दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
लोकप्रिय उषाराणी हत्तीचे निधन झाल्याचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.
उषाराणी हत्ती आजवर शेकडो पंचकल्याण महापूजेत सहभागी झाली होती,तर बेडकिहाळचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या वर्षातील तीनही पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पालखीला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत असे.
उषाराणी हत्तीने शेकडो पंचकल्याण महापूजेसह, बऱ्याच धार्मिक कार्यक्रमासह इतर कार्यक्रमात सहभागी होती, तर जाणता राजा महानाट्य, मालिका , व अनेक सिनेमात या हत्तीने काम केले होते.
निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथील पाटील मळ्यात उषाराणी हा मानाचा हत्ती वास्तव्यास होता. अल्पशा आजाराने उषाराणीचे निधन झाले. आचार्यरत्न देशभुषण महाराज यांनी कोथळी कुप्पानवाडी ट्रस्ट साठी त्या वेळी हत्तीचे पिल्लू आणले होते. बेडकिहाळ येथील पाटील यांच्या मळ्यातील खास करून बनविण्यात आलेल्या हत्तीचे वास्तव्य गृहातच राहत असे,त्यामुळे बेडकिहाळ व परिसरातील नागरिकांना त्याचा विशेष लळा लागला होता.
नांदणी मठाचे प . पू. जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजीनी श्रद्धांजली वाहिली, त्याच बरोबर उपस्थितानी उषाराणी च्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
खुल्या ट्रक मध्ये मृतदेह ठेऊन वाद्यांच्या गजरात गावांतून उषाराणीची मिरवणूक काढून कोथळी येथे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.