गणेशोत्सवातून सामंजस्याची अनोखी परंपरा : कॅम्पमधील हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श
बेळगाव :
धर्म, जात-पात यापलीकडे जाऊन एकमेकांच्या संस्कृतींना मान देणारे चित्र बेळगावच्या कॅम्प परिसरात दरवर्षी पाहायला मिळते. येथील रहिवासी सतीश रमेश निंगाडे यांच्या घरी मागील २५ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्याची आगळीवेगळी परंपरा जोपासली जात आहे.
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मीय मित्रमंडळी एकत्र येऊन बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचे सर्व सोहळे उत्साहाने साजरे करतात. उत्सव काळात कोणताही भेदभाव न करता सर्वजण मिळून मंडप सजवतात, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात आणि गणपती बाप्पाची आराधना करतात.
सतीश निंगाडे व त्यांच्या मित्रपरिवाराने सांप्रदायिक सौहार्दाची ही परंपरा आजवर अखंडित ठेवली आहे. कॅम्पमधील या घरातून दरवर्षी उठणारा “गणपती बाप्पा मोरया”चा जयघोष केवळ भक्तीच नव्हे तर ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश देतो.
ही अनोखी परंपरा समाजाला एकतेचे आणि सामंजस्याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.