बेळगाव:
तुळशी विवाह संपन्न होताच शुभमंगल कार्यांना वेग आला आहे. धडाधड लग्नाचे बार उडत आहेत. शुभमंगल सावधान अशी मंगलाष्टके कानावर पडत आहेत. मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर विवाह संपन्न झाले. त्यामुळेच मंगळवार हा शुभमंगल वार ठरला.
सलग विवाह समारंभामुळे मंगल कार्यालये वऱ्हाडी मंडळींनी फुलली आहेत. बँड बाजा आणि डॉल्बीचा दणदणाट सुरू झाला आहे. बँड बाजा बाराती आणि बाजारपेठेला सोन्याचे दिवस आले आहेत. मंगल कार्यालयांचे अडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. त्याचबरोबर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. कपडे , दागिने , भांडी, फर्निचर यांसारख्या वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी होत आहे. सोन्याचे दर वाढलेले असले तरीही सोन्याच्या खरेदीला गर्दी होत आहे. कपडे खरेदीसाठी देखील मोठी गर्दी होत आहे. पुढील सहा ते सात महिने मंगल कार्याचा धूमधडाका सुरूच राहणार आहे.
पुढील सात ते आठ महिने बाजारपेठेमध्ये मंगल कार्याच्या खरेदीसाठी गर्दी राहणार असून मोठी उलाढाल अपेक्षित आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये देखील मोठा उत्साह आहे. हा सीझन कॅश करण्यासाठी व्यापारी वर्ग सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकाने सुरू ठेवत आहे. व्यापारी वर्गाला मात्र कामगारांची उणीव जाणवत आहे. सौंदर्य प्रसाधनांच्या साधनाला देखील मागणी वाढली आहे.