दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा मंदिरातील हुंडीमधील नोटा ओल्या झाल्या होत्या. आता पाणी ओसरल्यावर ओल्या झालेल्या नोटा मंदिर परिसरात वाळत घालण्यात आल्या आहेत.
ढगफुटी सदृश्य पावसामुळे दोन दिवसापूर्वी सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा मंदिरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. देवीच्या गाभाऱ्यात देखील पाणी शिरले होते. पावसाचे पाणी मंदिरात ठेवण्यात आलेल्या दान पेटीत शिरल्यामुळे त्यातील नोटा आणि नाणी भिजून गेली होती.मंगळवारी या दानपेटी उघडून त्यात साठलेले पाणी काढून भिजलेल्या नोटा बाहेर काढण्यात आल्या. देवस्थानाच्या कर्मचाऱ्यांनी नोटा आणि नाणी वेगवेगळ्या केल्या.
नंतर या नोटा उन्हात धान्य वाळवतात त्याप्रमाणे मंदिराच्या आवारात वाळत घालण्यात आल्या आहेत.मंदिराची देखील स्वच्छता करण्यात आली असून नेहमीप्रमाणे दर्शन सुरु आहे अशी माहिती श्री यल्लम्मा देवस्थान प्राधिकरणाचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिली.