“ताराराणी हायस्कूलमध्ये त्रिवेणी संगम पालक मेळावा; पालक जबाबदारीवर भर”
खानापूर: तालुक्यातील मराठा मंडळ संचलित ताराराणी हायस्कूल येथे दहावीच्या विद्यार्थिनींसाठी त्रिवेणी संगम पालक मेळावा उत्साहात पार पडला.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक राहुल एन. जाधव यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजीराव एस. पाटील (संचालक, मराठा मंडळ बेळगाव) उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य ए. एल. पाटील (ताराराणी पीयू कॉलेज, खानापूर) यांनी पालकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. शाळेचे सहशिक्षक व्ही. एस. मुन्नोळकर यांनी प्रास्ताविक केले.
आईंचे प्रतिनिधित्व सौ. सविता जाडर तर वडिलांचे प्रतिनिधित्व श्री अरुण पाटील यांनी केले. यावेळी प्रमुख वक्ते प्राचार्य ए. एल. पाटील यांनी पालकांची मुलांच्या सर्वांगीण विकासातील भूमिका व जबाबदारी अधोरेखित केली.
मेळाव्याच्या शेवटी अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक राहुल एन. जाधव यांनी पालक-शाळा सहकार्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल. आर. पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन एम. वाय. अज्जपन्नावर यांनी मानले.
या पालक मेळाव्यामुळे पालक व शाळेतील संवाद अधिक दृढ होऊन विद्यार्थिनींना प्रेरणादायी वातावरण लाभेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.