बेळगावहून गोव्याला अनमोड मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर पश्चिम घाटात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर साठले असून पाण्यात वाहने अडकून पडत आहेत. बेळगावहून गोव्याला जाणाऱ्या आणि गोव्याहून बेळगावला येणाऱ्या प्रवाशांनी कारवार मार्गे प्रवास करावा असे प्रसिध्दी पत्रक सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रसिद्धीला दिले आहे.
मुसळधार पावसामुळे बेळगाव गोवा मार्गावर पाणी साठल्याने वाहतुकीला समस्या निर्माण झाली आहे.अडकलेली वाहने काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला.रस्त्यावर साठलेल्या पाण्यातून ट्रक चालक मार्ग काढत असल्याचे पाहायला मिळते.पाणी वाढल्याने अनेक वाहने थांबून होती.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कारवारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अनमोड घाट मार्गे वाहतुकीला तीन महिन्यांसाठी बंदी घालण्याचा आदेश बजावला आहे.
यामुळे गोव्याला कारवार मार्गे जाण्यासाठी जवळपास शंभर किलोमीटर फेरा मारून जावे लागणार आहे.गोवा सीमेवरील कर्नाटक राज्यातील लोक उपचारासाठी बांबोळी येथे जात असतात.त्यांना देखील मोठा फेरा मारून जावे लागणार आहे. बसना देखील जाण्यास बंदी घातल्यामुळे प्रवासी वर्गाला देखील मनःस्ताप सहन करावा लागणार आहे.