चोर्ला घाट मार्गे बेळगावाहून गोव्याला जाणाऱ्या मार्गांवरील पहाटे पासून वाहने ठप्प झाली आहे. त्यामुळे गोव्याला चोर्ला मार्गे जाणाऱ्या प्रवाशांची आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहचालकांची पंचाईत झाली आहे.
बेळगाव – चोर्ला-गोवा मार्गावर कालमनी व आमटे गावच्या दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे. अवजड वाहतूक करणारी एक ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला. त्यातच दुसरी ट्रक रस्ताच्या बाजूने पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना रस्ता खचल्याने ती पलटी झाली. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
या घटनेमुळे सकाळपासून शाळा–कॉलेजला जाणारे विद्यार्थी, नोकरी व व्यवसायासाठी प्रवास करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. पहाटे बंद पडलेला ट्रक अजूनही रस्त्यात असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.बेळगावहून गोव्याला दूध, भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पाठवला जातो. वाहतूक ठप्प झाल्याने वाहने रस्त्यातच थांबून आहेत.