घरासमोरच्या पाण्याच्या टाकीवरील झाकण उघडे राहिल्याने खेळता खेळता अनावधानाने पडलेल्या अडीच वर्षांच्या बालिकेचा बुडून मृत्यू झाला. साईशा संदीप बडवाण्णाचे साईशा बडवाण्णाचे (रा. कंग्राळ गल्ली) असे मृत बालिकेचे नाव आहे.
रविवारी सायंकाळी कंग्राळ गल्ली येथे ही घटना उघडकीस आली.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि रविवारी नळाला पाणी आले होते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी घरासमोरच्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडण्यात आले होते. पाणी भरल्यानंतर ते झाकण तसेच उघडे राहिले होते. दुपारच्या वेळी साईशा घरासमोर खेळत होती.
खेळता खेळता ती या पाण्याच्या टाकीत पडली. बराच वेळ घरच्यांचे याकडे लक्ष गेले नाही.काही वेळाने साईशा घरात दिसेना असे लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. घरातील कुणाचे तरी पाण्याच्या टाकीकडे लक्ष गेले. टाकीत शोध घेतला असता साईशाचा टाकीत दुर्दैवी अंत झाल्याचे लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आला. रात्री उशिरा या घटनेची खडेबाजार पोलिसांत नोंद झाली. पोलीस निरीक्षक राघवेंद्र बी. तपास करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी गर्दी केली होती. साईशाच्या अपघाती मृत्यूमुळे गल्लीतील व्यवहार रविवारी बंद ठेवण्यात आले होते.