तीन चोरट्यांना अटक :१२.७२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त
बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर घडलेल्या दागिने चोरीच्या प्रकरणात मार्केट पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १२ लाख ७२ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह १४३ ग्रॅम सोने जप्त केले आहे. फक्त तीन दिवसांच्या अवघ्या अवधीत या चोरीचा तपास करून आरोपींना पकडण्यात पोलिसांनी यशस्वी कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावे अनिता नितीना चौगुले (वय ४०), सिंपल श्रीकांत लोंडे (वय ३५) आणि निशा शंकर लोंडे (वय २५) अशी आहेत. ते सर्व बेळगाव येथील शिवबसव नगर, गँगवाडी येथे रहिवाशी आहेत.
दिनांक १५ मार्च २०२५ रोजी बेळगावच्या सेंट्रल बस स्टँडवर गर्दीत एका प्रवाशीचे दागिने चोरीला गेले होते. बसमधून उतरत असताना हुबळी येथील नेहरू नगर, गोकुळ रोडवरील श्रीमती कांचन विश्वनाथ गौडा यांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या संदर्भात गौडा यांनी मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
या प्रकरणाचा वेगवान तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त येडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट पोलिस स्टेशनचे निरीक्षक धामन्नावार यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक गठित करण्यात आले. या पथकात पीएसआय एच.एल. केरुर आणि गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पोलिसांनी तातडीने सुरू केलेल्या तपासातून आरोपींच्या गतिविधी ओळखून त्यांना अटक केले.
*सांबरा कुस्ती आखाडा दि 13 एप्रिल रोजी*
या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस आयुक्तांनी मार्केट पोलिस टीमचे अभिनंदन केले आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना झटपट पकडून नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण केला आहे.