*अशी झाली महापौर व उपमहापौर पदाची निवड*
बेळगावच्या महापौरपदी भाजपच्या शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली तर भाजपच्या रेश्मा पाटील उप महापौर निवडणुकीत विजयी झाल्या.
बेळगाव महानगरपालिका निवडणूक होऊन नगरसेवक निवडून आल्यावर तब्बल चौदा महिन्यांनी महापौर आणि उप महापौर निवडणूक घेण्यात आली.महापौर निवडणुकीसाठी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी अर्ज दाखल केला नाही त्यामुळे शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली.उप महापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजप तर्फे रेश्मा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर समितीतर्फे वैशाली भातकांडे यांनी अर्ज दाखल केला होता.रेश्मा पाटील यांना 42 मते तर वैशाली भातकांडे यांना चार मते मिळाली .
निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित असलेले प्रादेशिक आयुक्त एम.जी.हिरेमठ यांनी महापौर आणि उप महापौर निवडणुकीचा निकाल जाहीर केला.
महापौर आणि उप महापौर निवडणूक झाल्या नंतर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.महापौर,उप महापौर निवडणुकीला सहा जण अनुपस्थित राहिले.तीन नगरसेवक तीन मिनिटे उशिरा आल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला.यावेळी उशीर करून आलेल्या नगरसेवकांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली पण त्यांना सभागृहात प्रवेश देण्यात आला नाही.
सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले.त्या नंतर दुपारी तीन वाजता महापौर,उप महापौर निवडणुकीला प्रादेशिक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी एम. जी.हिरेमठ यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.निवडणूक झाल्या नंतर निवडणूक अधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी निवडणुकीचा निकाल घोषित केला.मतदानाच्या वेळी खासदार मंगला अंगडी,खासदार अण्णासाहेब जोल्ले,आमदार अभय पाटील,आमदार अनिल बेनके उपस्थित होते.महापौर ,उप महापौर निवड जाहीर झाल्या नंतर खासदार,आमदारांनी आणि नगरसेवकांनी महापौर आणि उप महापौरांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
खुर्शिदा मुल्ला,झरीना फत्तेखान आणि सोहेल संगोळी हे तीन मिनिटे उशिरा आल्यामुळे त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता आले नाही.महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखल्यामुळे त्यांनी सभागृहाच्या दरवाजाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले.निवडणुकीच्या वेळी महानगरपालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भाजपने महापौर आणि उप महापौर पदासाठी मराठी भाषिक उमेदवार जाहीर केल्यामुळे कन्नड संघटनांना पोटशूळ उठला असून महानगरपालिका आवारात येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या करवे संघटनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन महानगरपालिका आवारात प्रवेश करण्यापासून रोखले.
त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.कन्नड भाषिक नगरसेवकांना महापौर,उप महापौर पदाची संधी द्यायला हवी होती असे म्हणून करवे कार्यकर्त्याने लोकप्रतिनिधींवर देखील तोंडसुख घेतले.