रक्कासकोप्प जलाशय भरले; पाण्याची टंचाई होणार नाही
बेळगाव (प्रतिनिधी):
शहराच्या मुख्य जीवनवाहिनीपैकी एक असलेले रक्कासकोप्प जलाशय यंदा पूर्ण क्षमतेने भरून गेले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक पाणी साठले आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासणार नाही, अशी माहिती महापौर मंगेश पवार यांनी गुरुवारी दिली.
रक्कासकोप्प जलाशय परिसरात पार पडलेल्या गंगारती आणि बागिन अर्पण कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांपासून अपुरा व अनियमित पाऊस झाल्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत होती. मात्र यंदा वेळेवर पाऊस झाल्याने जलाशय भरले असून, आगामी काळात पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.”
महापौर पवार यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने व योग्य वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास पालिका आयुक्त शुभा बी, उपमहापौर वाणी जोशी, विरोधी पक्षनेते सोहेल संगोल्ली तसेच नगरसेवक व प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुक्त शुभा बी यांनीही जलाशय भरल्यामुळे शहरात पुरेसा पाणी साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. “नियोजनबद्ध पद्धतीने जलसाठ्याचे व्यवस्थापन केल्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही,” असे त्या म्हणाल्या.
या पावसाळ्यात जलाशयात झालेला पाणीसाठा बेळगावकरांसाठी दिलासादायक ठरणार असून, पालिकेनेही यासाठी आवश्यक नियोजन सुरू केले आहे.
Dmedia 24 > Local News > *रक्कासकोप्प जलाशय भरले; पाण्याची टंचाई होणार नाही*
*रक्कासकोप्प जलाशय भरले; पाण्याची टंचाई होणार नाही*
Deepak Sutar07/08/2025
posted on
