मुसळधार पावसामुळे आणि वाहतूक सुविधा नसल्यामुळे खानापूर तालुक्यातील आमगाव गावातील महिलेला उपचारासाठी ग्रामस्थांनी चक्क स्ट्रेचर वरून चार किलोमिटर पायपीट करत आणून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी खानापुरला आणले.
आमगाव गावातील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी (३८) हिला शुक्रवारी सायंकाळी छातीत दुखून श्वसनाला त्रास होऊ लागला.गावात तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले पण काही उपयोग झाला नाही.पावसामुळे गावाचा संपर्क तुटला असल्याने गावातील एका शिक्षकाने १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका आणायला सांगितले.गावातील लोकांनी बांबू आणि अन्य साहित्य वापरून स्ट्रेचर तयार केले.
नंतर गावातील पंधरा वीस जणांनी त्या महिलेला चक्क स्ट्रेचरवर बांधून धो धो पावसात चार किलोमीटर अंतर चालत कापले.आळीपाळीने ग्रामस्थ महिलेला नेण्यासाठी स्ट्रेचर पकडत होते. पाऊस लागू नये म्हणून महिलेला प्लास्टिकने झाकले होते.एक जण तिच्या चेहऱ्यावर पाणी पडू नये म्हणून छत्री धरून चालला होता.अखेर चार किलोमिटर अंतर पार केल्यावर तिला रुग्णवाहिकेतून खानापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले.तेथे उपचार करण्यास प्रारंभ झाला