गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गळती सुरू झाल्याने धारवाड ते बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील सोळा तास बंद असलेली वाहतूक सकाळी अकरा वाजता सुरू झाली.
धारवाड येथे गॅसची वाहतूक करणारा टँकर पुलाखालून जात असताना तेथे अडकला आणि त्यातून गॅसची गळती सुरू झाली.टँकर मध्ये अत्यंत ज्वलनशील गॅस असल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करून अन्य मार्गाने वळवली.जवळच असलेल्या औद्योगिक वसाहती मधील सगळ्यांना बाहेर काढून कारखाने बंद करायला लावले होते.
गॅस गळती रोखण्यासाठी मंगलोर येथून तज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.एच पी कंपनीचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते.गुरुवारी सकाळी मंगलोर येथून तज्ञ पथक दाखल झाले आणि त्यांनी गळती होत असलेल्या टँकर मधील गॅस दुसऱ्या टँकर मध्ये भरून गॅस गळती थांबवली.अखेर सकाळी अकरा वाजता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.