वळवाचा शहर परिसराला तडाखा
बेळगाव, प्रतिनिधी:
सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला ढग दाटून आले आणि थोड्याच वेळाने जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाने शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेमध्ये काही प्रमाणात गारठा निर्माण झाला होता.
सोमवारी सकाळपासूनच कमालीची उष्णता जाणवत होती. त्यामुळे पावसाची दाट शक्यता होती. सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. बाजारासाठी आलेल्या नागरिकांची या पावसामुळे धांदल उडाली. भाजी विक्रेत्यांची सुद्धा एकच धावपळ दिसून आली. https://dmedia24.com/distribution-of-prasad-on-behalf-of-kapileshwar-temple-trust/
पावसापासून बचाव करण्यासाठी काही नागरिकांनी जवळच असलेल्या दुकानांमध्ये थांबणे पसंत केले. तर ज्यांना वेळेत आणि लवकर जाणे अनिवार्य होते अशांनी रिक्षाने जाणे पसंत केले. थोड्या वेळानंतर पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर काही नागरिक छत्री घेऊन जाताना तर काहीजण भिजत जाताना दिसून आले.
गटारीतील पाणी रस्त्यांवर
शहरातील काही ठिकाणच्या गटारीमध्ये कचरा अडकून राहिल्याने त्या गटारी पूर्णपणे ब्लॉक झाल्या होत्या. सोमवारी झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी गटारीत गेल्याने या गटारीतील पाणी कचऱ्यासकट रस्त्यावर येऊन थांबले. काही ठिकाणच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले.
ढगांचा गडगडाट
पाऊस सुरू होण्याआधी आणि पाऊस सुरू झाल्यानंतर ढगांचा गडगडाट सुरू होता. त्याचबरोबर विजांचा लखलखाट देखील सुरू होता. पावसाबरोबरच वाऱ्याचा वेग जोरात होता. या पावसामुळे काही ठिकाणी झाडाच्या फांद्या देखील तुटून पडल्या होत्या. पावसा दरम्यान काही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला होता.