कन्नड सक्तीविरोधी मोर्चाला निलजी ग्रामस्थांचा ठाम पाठिंबा
बेळगाव | प्रतिनिधी
सीमाभागात मराठी भाषिकांवर होणाऱ्या कन्नड सक्तीविरोधात ११ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित मोर्चाला निलजी गावातील नागरिकांनी ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या मोर्चात सामूहिक सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस गोपाळ पाटील, नारायण गोमाणाचे, भावकांना मोदगेकर, ता.पं. सदस्य वसंत सुतार, विठ्ठल गोमाणाचे, हृतिक चंद्रकांत पाटील, सतीश राजू पाटील, रोहित गोमाणाचे, सुरेश पाटील, प्रकाश गोमाणाचे, कल्लाप्पा फौंडू पाटील, कल्लाप्पा मोदगेकर, मनोहर पाटील, अनिल बाळू पाटील, बालाजी पाटील, नागो मोदगेकर तसेच इतर अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध व्यक्त करण्यात आला. कर्नाटक सरकारने सीमाभागातील शासकीय व्यवहारांतून मराठी भाषेला दूर ठेवत कन्नड सक्तीचा अवलंब केल्यामुळे संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.
“न्याय, हक्क आणि अस्मिता जपण्यासाठी संपूर्ण निलजी गाव ११ ऑगस्टच्या मोर्चात उतरणार आहे,” असा ठाम निर्धार यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला. मराठी जनतेच्या हक्कांसाठी एकजूट दाखवण्याची गरज असल्याचे मत नेत्यांनी मांडले.
हा निर्धार सीमाभागातील आंदोलनाला नवे बळ देणारा ठरणार असून, इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र एकीकरण समितीने व्यक्त केला आहे.