2 तारखेचा कार्यक्रम दिसून आला ” शासकीय ” स्वरूपाचा तर आजच्या सोहळ्याला आली ” शिवशाही ” ची अनुभूती
बेळगाव, दिनांक 5
ढोल-ताशांचा निनाद आणि शिव नामाच्या जयघोषात आज बेळगावच्या राजहंसगडावर प्रस्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य अशा मूर्तीचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला.
राजहंसगडावरील शिवमुर्तीच्या अनावरण आणि उद्घाटन सोहळ्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलेच राजकारण तापले होते. विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर (कॉंग्रेस) आणि माजी आमदार संजय पाटील (भाजप) यांच्यात श्रेयवादावरून कलगीतुरा निर्माण झाला होता. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उद्घाटन सोहळ्याची तारीख जाहीर केल्यानंतर भाजपने श्रेय लाटण्यासाठी प्रोटोकॉलचा मुद्दा पुढे करीत तीन दिवस आधीच शिवमुर्ती अनावर सोहळा पार पाडला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेला तो सोहळा शासकीय स्वरूपाचा दिसून आला तर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडलेल्या आजच्या भव्य दिव्य सोहळ्याला शिवशाहीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे प्रकर्षाने जाणवले.
घोड्यावर स्वार झालेले मावळे, त्यामागे धनगरी ढोल वादक, शिवनामाचा जागर करणारे शिवभक्त, मागे तलवार-दांडपट्टा धारी आणि तिरकमान हाती घेतलेल्या मावळ्यांच्या गराड्यात शिवपालखी अशा जल्लोषी वातावरणात पायथ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले, लातूरचे आमदार धीरज विलासराव देशमुख, कोल्हापूरचे धडाडीचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवा काँग्रेस बेळगाव उपाध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांचे गडावरील शिवमूर्ती आवारापर्यंत मार्गस्थ झाले. प्रवेशद्वारावर ढोल-ताशांचा निनादात अतिथीवर पुष्प वृष्टी करण्यात आली. अतिथी गडावर पोहोचताच शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. अतिथी मान्यवरांनी गडावरील सिद्धेश्वराचे दर्शन घेतले.
राष्ट्रध्वज ” तिरंगा ” गडावरील उंच अशा ध्वजस्तंभावर चढविण्यात आला. राष्ट्रगीत झाले. ” भारत माता की जय ” वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या.
यानंतर झाला अभूतपूर्व असा शिवमूर्तीचा उदघाटन सोहळा. हवेत रंग सोडण्यात आले. रंगीबेरंगी फरफऱ्या हवेत उडाल्या. ढोलताशांचा आवाज निनादला. जयघोष झाला. तुताऱ्या निनादल्या आणि मूर्ती समोरील भगवा कपडा हटवून भव्यदिव्य अशा पंच धातूच्या 50 फुटी शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ मूर्तीचे उदघाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे हे दृश्य ” याची देही, याची डोळा ” पाहण्याजोगे होते. भव्यदिव्य शिवमूर्तीच्या चरणी पुष्पहार ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले आणि इतर मान्यवर नतमस्तक झाले. मूर्तीभोवती हत्यारबंद मावळ्यांचा गराडा होता आणि वातावरण निर्मिती अभूतपूर्व अशी होती.