पंतप्रधानांचा असा असणार बेळगाव दौरा
कर्नाटकात देखील आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वेगवेगळ्या निमित्ताने कर्नाटकात अलीकडे वारंवार दौरे होत आहेत.आता २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेळगाव येथील करोडो रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाचे उदघाटन करण्यात येणार आहे याशिवाय शेतकऱ्यांचा आणि भाजप कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला असून मेळाव्याला लाखोंची उपस्थितीत अपेक्षित असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.त्याच बरोबर शिमोगा येथील विमानतळाचे देखील उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.मागच्या आठवड्यात मोदींनी कर्नाटक दौरा केला होता.त्यावेळी ते बंगलोर येथील एरो शोला उपस्थित राहिले होते.मे महिन्यात कर्नाटकात विधानसभेची मुदत संपत असून विधानसभा निवडणुकांची तारीख निवडणूक आयोग लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.त्यामुळे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटक दौऱ्यावर वारंवार येत आहेत.मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्या समोर ठेऊन जसे पंतप्रधान मोदींच्या वारंवार मुंबई दौरे होत आहेत त्या प्रमाणेच पुन्हा कर्नाटक विधानसभा काबीज करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी जोर लावला आहे.