दिवसाढवळ्या घरात घुसून दोन मुलांचे अपहरण करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गोळीबार करून मुलांची सुखरूप मुक्तता केली.अपहरणकर्त्यापैकी एक जण कोल्हापूरचा आहे.
अथणी तालुक्यातील कोहळी गावात ही घटना घडली.भरदिवसा पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून मुलांचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडल्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वस्ती देसाई आणि व्योम देसाई अशी अपहरण करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत.मुलांचे अपहरण करून नंबर प्लेट नसलेल्या कारमधून मुलांना नेण्यात आले.कोहळी – सिंधुर मार्गावरून महाराष्ट्रात जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या अपहरण कर्त्याना पोलिसांनी अडवले.
यावेळी अपहरण कर्त्यानी पोलिसांवर हल्ला केला.यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात एकाच्या पायाला गोळी लागली.एक फौजदार देखील अपहरणकर्त्यांच्या हल्ल्यात जखमी झाला.पोलिसांनी एकूण तीन अपहरणकर्त्याना अटक केली.रविकिरण कमलाकर रा.अंकली,संभा कांबळे रा.कोल्हापूर आणि बिहार मधील शाहरुख शेख अशी पोलिसांनी अटक केलेल्या अपहरणकर्त्यांची नावे आहेत.