“चन्नम्मा सर्कलजवळील स्मार्ट बसस्थानकाची दुर्दशा; स्मार्ट सिटीचा ‘अस्मार्ट’ चेहरा”
बेळगाव :
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत चन्नम्मा सर्कल परिसरात उभारण्यात आलेले स्मार्ट बसस्थानक सध्या दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे. शहराच्या विकासाचे प्रतीक ठरावे म्हणून बांधलेले हे बसस्थानक आज बेवारस दिसत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहराला आधुनिक स्वरूप देण्यासाठी गाजावाजा करून सुरू झालेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अनेक कोटींचा खर्च करण्यात आला. मात्र, या ठिकाणी ना नियमित देखभाल होते, ना सुविधांचा वापर होतो. फक्त मोडकळीस आलेली रचना, तुटलेले साहित्य आणि आजूबाजूला साचलेला कचरा एवढेच चित्र समोर येते.
या प्रकल्पावर खर्च झालेला प्रचंड निधी वाया जात असल्याचे स्पष्ट दिसत असून “स्मार्ट सिटी खरंच स्मार्ट आहे का?” असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. काही नागरिकांनी तर “कागदोपत्री स्मार्ट, प्रत्यक्षात मात्र निष्क्रिय प्रकल्प” अशी टीकाही केली आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभे असलेले हे दुर्लक्षित बसस्थानक आता “स्मार्ट सिटी की स्मशान सिटी?” असा कटू प्रश्न बेळगावकरांसमोर ठेवत आहे.