गणेश चतुर्थीला काही दिवस उरले असून गणेश मूर्ती तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असून लवकरच रंग देण्यास प्रारंभ होणार आहे. यावर्षी पर्यावरण पूरक गणेश मूर्तीना अधिक मागणी आहे. शाडूचे दर वाढल्यामुळे गणेश मूर्तीच्या किमतीत यावर्षी वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बेळगावातील परशराम पालकर कुटुंबीय हे गेल्या पाच पिढ्यांपासून गणपतीच्या मूर्ती तयार करतात.त्यांचे संपूर्ण कुटुंब मूर्ती तयार करण्यात गुंतले आहे.घरगुती गणपती बरोबरच सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती ते तयार करतात.गेल्या अनेक वर्षापासून मराठा लाईट इन्फंत्रीट्रिची शाडूची मूर्ती ते करत आहेत.यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील शाडूची मूर्ती बसवण्यावर भर दिला आहे.पर्यावरण संबंधी जनतेत जागृती होत असल्याने शाडूच्या मूर्तींची मागणी दरवर्षी वाढत असल्याचे मूर्तिकार परशराम पालकर यांनी सांगितले.
दगडूशेठ,लाल बागचा राजा,कृष्ण,ज्योतिबा अवतारातील मूर्तींना यावर्षी अधिक मागणी आहे.आता मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून मूर्तींना रंग देण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.