बेळगाव :तारांगण आयोजित आणि सुनील टेक्सटाईल्स प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा’ होम मिनिस्टर स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. सुनिल टेक्स्टाईलच्या टेरेसवर झालेल्या या कार्यक्रमात राधिका राजगोळकर यांनी पैठणी जिंकत विजेतेपद पटकावले, तर जान्हवी बद्री उपविजेती ठरली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती सुनील काठारिया आणि सुनिता काठारिया , अरुणा गोजे – पाटील , टी डी पाटील होते.
यावेळी गुंपण साहित्य अकादमीचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बिळगोजी यांना जाहिर झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
स्पर्धेत एकूण दहा खेळ आयोजित करण्यात आले होते. यामध्ये लिंबू चमचा, संगीत खुर्ची, चिमटे लावणे, स्ट्रॉ केसात घालणे, प्लास्टिक ग्लास मनोरा रचना, फुगे फोडणे, लंगडी घालणे यांसारखे खेळ महिलांनी उत्साहाने खेळले.
राधिका राजगोळकर यांनी विजेतेपद मिळवत पाच हजार रुपयांची पैठणी जिंकली, तर जान्हवी बद्री यांनी चार हजार रुपयांची पैठणी मिळवत उपविजेतेपद पटकावले. विजेत्यांचा गौरव कविता काठारिया, दर्शना काठारिया, आणि राकेश काठारिया यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पाटील सर आणि संजय साबळे सर यांनी बहारदार आणि प्रबोधनात्मक पद्धतीने केले. विशेष म्हणजे कार्यक्रमाला दोनशेहून अधिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तारांगणच्या प्रमुख अरुणा गोजे-पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तारांगणच्या संचालकांनी विशेष मेहनत घेतली. ‘खेळ, उत्साह, प्रबोधन आणि सन्मान’ यांचा सुरेख संगम असलेल्या या स्पर्धेने बेळगावच्या महिलांसाठी आनंदाचे क्षण निर्माण केले.