कर्नाटकातील नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ झाला.प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत विद्यार्थी आणि पालक यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.प्रारंभोत्सव निमित्त बेळगाव शहरातील सगळ्या शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
काही शाळांमध्ये तर फुलांचे तोरण,आंब्याची पाने आणि नारळाच्या झापळ्या लावून वर्ग सुशोभित करण्यात आले होते.काही शाळांमध्ये फुग्यांची कमान शाळेच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात आली होती.शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षक आणि शिक्षिका थांबून शाळेत येणारे विद्यार्थी आणि पालक यांच्यावर पुष्पवृष्टी करत होते तर विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते.काही शाळांमध्ये विद्यार्थी आणि पालक यांना मिठाई देण्यात आली.
शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक आणि पालक यांची बैठक झाली.या बैठकीत मुख्याध्यापकांनी पालकांना शिक्षकांचा परिचय करून देऊन सूचना मांडण्याचे आवाहन केले.शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभ दिनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे पुन्हा एकदा शाळांचे परिसर गजबजून गेल्याचे पाहायला मिळाले.