बेळगांव: तालुक्यातील होनीहाळजवळ खून झालेल्या तरुणाची ओळख पटली असून तो बेळगाव शहरातील अंजनेयनगर परिसरातील आहे. निंगनगौडा शिवनगौडा सनगौडर (वय २६) असे त्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास होनीहाळजवळ अनोळखी तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. मारीहाळ निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून मंगळवारी दिवसभर याचा तपास सुरू होता. त्याचा अन्यत्र खून करून मृतदेह येथे टाकल्याचा संशय पोलिसांना आहे.
परंतु, तो कोणी व कशासाठी केला, हे समजू शकलेले नाही. फोन पे व्यवहार उपयोगी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृत व्यक्तीजवळ फोन सापडलेला नाही. परंतु, त्याने केलेल्या एका व्यवहारावरून फोन-पेचा तपशील मिळाला. त्यानंतर बँकेत जाऊन त्याचा मोबाईल क्रमांक सापडला असता. त्याची ओळखी पटली. यानंतर त्याच्या फोनचे कॉल डिटेल्स तपासणे सुरू आहे.
त्याच्याशी संपर्क साधणाऱ्या व्यक्ती, झालेले संभाषण, संदेश याद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, अद्याप खुनी कोण हे स्पष्ट झाले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी सांबरा विमानतळाच्या भिंतीला लागूनच असलेल्या होनिहाळ येथील शेतवडीत निंगनगौडाचा मृतदेह आढळून आला होता. सिमेंटच्या विटांनी डोक्यावर हल्ला करून त्याचा
खून केल्याचे उघडकीस आले होते. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. होनिहाळ येथे आढळून आलेल्या मृतदेहाची छायाचित्रे सर्व पोलीस स्थानकांना पाठविण्यात आली होती. सोमवारी रात्री श्रीनगर येथील निंगनगौडाचे कुटुंबीय तो बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल करण्यासाठी माळमारुती पोलीस स्थानकात पोहोचले.
त्यावेळी माळमारुती पोलिसांनी होन्निहाळ येथे आढळलेल्या मृतदेहाची छायाचित्रे कुटुंबीयांना दाखविली. त्यामुळे त्याची ओळख पटली.
नाहीनिंगनगौडा व्यवसायाने कारचालक होता. रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी आपण काम करीत असलेल्या मालकांना देवदर्शनासाठी कारमधून त्याने सौंदत्तीला नेले होते. सौंदत्तीहन बेळगावला येताना दुपारी यरगट्टी येथे निंगनगौडा कारमधून उतरला. यरगट्टीहून जवळच असलेल्या अलदकट्टी या आपल्या गावी जाऊन येण्याचे सांगितले होते. गावात कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर बेळगावला येण्यासाठी त्याने यरगट्टी येथे बस पकडली होती. मात्र तो बेळगावला पोहोचला नाही. होनिहाळजवळ दुसऱ्या दिवशी सोमवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी खून झालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. मारिहाळ पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.