प्रातःकालीन गायन सभा श्रोत्यांच्या लक्षणीय उपस्थितीत पार
आर्ट्स सर्कल बेळगांव आयोजित प्रातःकालीन गायन सभा श्रोत्यांच्या लक्षणीय उपस्थितीत पार पडली. लोकमान्य रंगमंदिर येथे असलेल्या ह्या कार्यक्रमात आंतराराष्ट्रीय ख्यात गायक पं. विनायक तोरवी ह्यांचे गायन श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेले.
सुरुवातीस श्री. प्रभाकर शहापूरकर ह्यांनी सर्व कलाकारांचे आणि श्रोत्यांचे स्वागत केले आणि कलाकारांचा परिचय करून दिला. अध्यक्षा लताताई कित्तूर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
पं. विनायक तोरवी ह्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग अहिर भैरवने केली. त्यात ‘रसिया म्हारा’ हा ख्याल विलंबित एकताल आणि नंतर ‘मनुवा तू जागत रहियो’ ही तीनतालातील आणि ‘बेग बेग आवो मंदिर’ ही एकतालातील रचना त्यांनी सादर केली. ह्या दोन्ही पं. जगन्नाथबुवा पुरोहितांच्या रचना होत्या.
त्यानंतर त्यांनी राग अल्हैय्या बिलावल आणि राग जौनपुरी मधील काही रचना सादर केल्या.
मध्यंतरानंतर पं. तोरवी ह्यांनी राग शुद्ध सारंग सादर केला. त्यानंतर एक कन्नड भजन आणि भैरवीवर आधारित मराठी भजन त्यांनी सादर केले.
पं. विनायक तोरवी ह्यांना धारवाडचे श्री. श्रीधर मांड्रे ह्यांनी तबलासाथ दिली. संवादिनी साथ डॉ. सुधांशू कुलकर्णी ह्यांनी दिली. दोन्ही कलाकारांना गायक पं. तोरवी आणि सर्व प्रेक्षकांनी मनःपूर्वक दाद दिली.
श्री. विनय कुलकर्णी ह्यांनी सर्व कलाकारांचे, प्रेक्षकांचे, प्रसिद्धी माध्यमांचे आणि रंगमंदिराच्या संचालकांचे आभार मानले.