बेळगाव दक्षिण विभागाच्या उप नोंदणी व विवाह नोंदणी कार्यालयावर लोकायुक्त पथकाने दुपारी अचानक भेट दिल्यामुळे तेथील कर्मचारी आणि तेथे वावर असलेल्या एजंट वर्गाचे धाबे दणाणले.बेळगाव दक्षिण उप नोंदणी कार्यालयात तेथे कामासाठी गेलेल्या नागरिकांची कर्मचारी आणि एजंट अक्षरशः लुटमार करतात अशा तक्रारी अनेकांनी केल्या होत्या.
या तक्रारी लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पर्यंत गेल्याने लोकायुक्त पथकाने उप नोंदणी कार्यालयाला अचानक भेट देऊन तेथे तपासणी केली.कार्यालयातील फाईल्स,संगणकात असलेली माहिती आणि चलन आदींची तपासणी लोकायुक्त पथकाने केली.पैसे देऊन जागेचे मूल्य कमी करणे,रस्त्याची रुंदी कमी दाखवणे आदी प्रकार बक्कळ पैसे घेऊन उप नोंदणी कार्यालयात केल्या जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
लोकायुक्त पथकाने दोन तासाहून अधिक काळ कार्यालयात झाडाझडती घेतली त्यामुळे कर्मचारी हबकून गेले होते.लोकायुक्त पथकाच्या हाताला काय लागले याचा तपशील उघड झाला नाही.