“उचगावच्या राजाचा रौप्यमहोत्सवी आगमन सोहळा; भव्य मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर”
बेळगाव : शिवज्योत युवक मंडळ, गणपत गल्ली उचगाव यांच्या वतीने आयोजित रौप्यमहोत्सवी उचगावचा राजा श्री गणेश मूर्ती आगमन सोहळा उत्साह आणि भक्तिभावाने पार पडला.
वेशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या आगमन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवपुतळ्याच्या पूजनाने झाली. पूजनाचा मान म.ए. समितीचे कार्याध्यक्ष आर.एम. चौगुले, भाजप नेते विनय कदम आणि बाळकृष्ण तेरसे यांच्या हस्ते पार पडला. दीपप्रज्वलनाचा मान काँग्रेस नेते जयवंत बाळेकुंद्री, एल.डी. चौगुले, माजी सरपंच चेतन पाटील, रामा कदम, संभाजी कदम, जावेद जमादार, बंडू पाटील, गजानन बांदिवडेकर, इराप्पा पावशे यांना मिळाला.
मुख्य पाहुणे म्हणून मल्लाप्पा मेणसे, मनोहर कदम, अशोक चौगुले, गोपाळ पावशे, डॉ. प्रताप पावशे, कृष्णा होनगेकर, विठ्ठल मेणसे, पुंडलिक पावशे, पवन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
गणेशमूर्तीचे पूजन करून आगमन सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशा पथक, झांज वादन, महिलांची लेझीम आणि योग प्रात्यक्षिके यांनी मिरवणुकीला रंगत आणली.
यावेळी आर.एम. चौगुले यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याची माहिती देताना सांगितले की, “शिवज्योत मंडळ हे सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांत अग्रेसर राहिले आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.ओ. चौगुले यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष बाबाजी पावशे यांनी मानले.
या भव्य आगमन सोहळ्यामुळे गावभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.