इंडीयन मेडिकल असोसिएशन,डेंटल मेडिकल असोसिएशन,आयुष मेडिकल असोसिएशन या संघटनांच्या वतीने शनिवारी काम बंद आंदोलन छेडून महिला डॉक्टरच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यात आला.पश्चिम बंगालची राजधानी कोलकता येथे स्तानकोत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉक्टर विद्यार्थिनीवर झालेल्या अमानवीय अत्याचाराच्या घटनेचा निषेध करून विविध संघटनांनी आंदोलन छेडले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि अन्य संघटनांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.वीर राणी कित्तूर चन्नमा चौकात मानवी साखळी करून विद्यार्थ्यांनी वाहतूक रोखून धरली.यावेळी वुई वॉन्ट जस्टिस अशी जोरदार घोषणाबाजी विद्यार्थ्यांनी केली.गुन्हेगाराला फाशी द्या,जीव वाचवणाऱ्या हाताना संरक्षण द्या,नो सेफ्टी नो ड्युटी,महिलांवरील अत्याचार थांबवा असे मजकूर लिहिलेले फलक विद्यार्थ्यांनी हातात धरले होते.
चौकात मानवी साखळी करून वाहतूक रोखून धरलेली असताना एक रुग्णवाहिका आली.यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी बाजूला होऊन रुग्णवाहिकेला जाण्यास वाट करून दिली.नंतर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चाने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.गुन्हेगाराला कठोर सजा करावी,महिलांच्या सुरक्षेसाठी प्राधान्य द्यावे, डॉक्टराना संरक्षण द्या अशा मागण्या निवेदनाद्वारे संघटनांनी केली आहे.