नवरत्न सन्मानाने गणेश फेस्टिवलची भव्य सांगता; बेळगावात गौरवाचा सोहळा
बेळगाव :
गेल्या २४ वर्षांपासून सातत्याने आयोजित होत असलेल्या आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला विधायक दिशा देणाऱ्या श्री गणेश फेस्टिवलचा समारोप शुक्रवारी सायंकाळी झाला. गुड शेड रोडवरील श्री माता सभागृहात पार पडलेल्या नवरत्न सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावर्षीचा फेस्टिवल मंगळवार, १९ ऑगस्टपासून सुरू झाला होता. गेल्या तीन दिवसांत ‘होम मिनिस्टर’, महिलांसाठी स्पर्धा तसेच लोकसंस्कृतीचे विविध कार्यक्रम रंगले. अंतिम दिवशी नवरत्न सन्मान प्रदान करून सोहळ्याची सांगता झाली.
यावर्षी सन्मानित नवरत्न :
समाजसेवक – संतोष दरेकर
साहित्यरत्न – मीरा तारळेकर
नाट्यभूषण – वैभव लोकूर
संगीतरत्न – सीमा कुलकर्णी
उद्योगरत्न – सतिश लाड
क्रीडा रत्न – राम पवार
श्रमसेवा – अनिता राऊत
कृषिरत्न – आशा नाईक
सामाजिक संस्थेचा पुरस्कार – दुर्गवीर प्रतिष्ठान
सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र अशा स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात अध्यक्ष मनोहर देसाई यांच्यासह संजीव नेगिनहाळ, मनोरमा देसाई, डॉ. मीना पाटील, प्रतिभा नेगिनहाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सत्कारमूर्तींनी आपल्या क्षेत्रातील कार्याची उजळणी करताना या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन वसुंधरा सांबरेकर यांनी केले तर आभार श्रीकांत काकतीकर यांनी मानले. सोहळ्याला गणेश भक्त, स्थानिक सोसायट्यांचे पदाधिकारी व शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.