बेळगाव गणेश फेस्टिवलची उत्साही सुरुवात – ‘होम मिनिस्टर’ विजेतेपद कोमल कोलकुप्पी यांच्या नावावर
बेळगाव, प्रतिनिधी –
बेळगावमध्ये सुरू झालेल्या गणेश फेस्टिवलचा प्रारंभ मंगळवारी ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय स्पर्धेने उत्साहात झाला. श्री माता सोसायटी, भक्ती महिला सोसायटी, राजमाता महिला सोसायटी, समर्थ सोसायटी व ज्ञानमंदिर इंग्रजी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचे फेस्टिवल मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आले आहे.
या स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. अखेरीस कोमल कोलकुप्पी यांनी विजेतेपद पटकावत मानाचा तुरा मिळवला, तर अंकिता पाटील उपविजेत्या ठरल्या.
न्यु गुडशेड रोडवरील श्री माता सोसायटीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मनोरमा देसाई (राजमाता सोसायटी) व ज्योती अग्रवाल (श्री भक्ती सोसायटी) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. मीना पाटील यांनी गणेश पूजन केले.
गेल्या २५ वर्षांपासून हा फेस्टिवल महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी आयोजित केला जात आहे. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा ‘नवरत्न सन्मान’ करण्यात येतो.
या वेळी विनायक बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत महिलांसाठी मनोरंजक खेळ घेण्यात आले. विजेत्या आणि उपविजेत्यांना बी.आर. पावटे यांच्या हस्ते पैठणी साड्या भेट देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे स्वागत ज्योती अग्रवाल यांनी केले, सूत्रसंचालन प्रतिभा नेगीनहाळ यांनी तर आभार प्रदर्शन रूपाली जनाज यांनी केले.
दरम्यान, उद्या (बुधवार) दुपारी तीन वाजता महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, यात वरीच्या तांदळाचे गोड व तिखट पदार्थ सादर केले जाणार आहेत.