फक्त चर्चा न करता प्रश्न मार्गी लावा -समितीची मागणी
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मंत्री सीमासमन्वक मंत्री श्री शंभूराज देसाई यांची शिनोळी ता.चंदगड येथे भेट घेऊन निवेदन देण्यात आले आणि सीमावासीयांच्या भावना मांडण्यात आल्या.
सर्वप्रथम सीमासमन्वक मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल श्री देसाई यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच महाराष्ट्र शासनाने सीमाप्रश्नी चालू घडामोडींची गंभीर दखल घेत सदर बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत जी बैठक झाली त्याबद्दल शासनाचे अभिनंदन करण्यात आले. पण फक्त चर्चेवर समाधान न राहता महाराष्ट्र शासनाने प्रश्न निकालात लागेपर्यंत येथील मराठी भाषिकांना त्यांचे भाषिक अधिकार मिळवून देण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली.
यावेळी विविध विषयांवर चर्चा केली निवेदनाला उत्तर देताना श्री शंभूराज देसाई यांनी नागपूर अधिवेशन झाल्यानंतर बेळगावात येऊ आणि महाराष्ट्र शासन सीमाप्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही दिली.
यावेळी युवा समिती उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, प्रवीण रेडेकर, सुरज कणबरकर,महेंद्र जाधव, महादेव हुंदरे, सुभाष मरुचे आदी उपस्थित होते.