बिम्स वसतिगृहात वैद्यकीय विद्यार्थिनीचा मृत्यू; मानसिक नैराश्य कारणीभूत असल्याची शक्यता
बेळगांव :
बेळगांव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (बिम्स) च्या वसतिगृहात सोमवारी रात्री एका वैद्यकीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत विद्यार्थिनीचे नाव प्रिया कार्तिक (वय २७, रा. बंगळुरू) असे असून, ती जिल्हा रुग्णालयात रुग्ण तपासणीच्या प्रशिक्षणात होती.
प्राथमिक माहितीनुसार, प्रियाने औषध सेवन करून आत्महत्येचा मार्ग निवडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. काही दिवसांपूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी भेट देऊन बिम्सचे संचालक डॉ. अशोक शेट्टी यांनी सांगितले की, प्रिया मानसिक आजाराने त्रस्त होती आणि ती नैराश्याच्या गर्तेत होती. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेची नोंद एपीएमसी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.